Inspirational journeys

Follow the stories of academics and their research expeditions

शुभंकरोती कल्याणं | आरोग्यम धनसंपदा

Gruh Shala

Thu, 17 Oct 2024

शुभंकरोती कल्याणं | आरोग्यम धनसंपदा


न कळत्या वयापासून संध्याकाळी दिवे लागणीला हा श्लोक  देवापुढे रोज म्हणण्याची सवय आईने लावली. त्याचा अर्थ , त्याचे महत्व कळावे  हे ते वयच नव्हते. तो एक सवयीचा भाग होता .

जसजशी वर्षे गेली तसतसा ह्या श्लोकाचा अर्थ समजायला लागला . घरात रोज होणारी स्वच्छता, व्यवस्थितपणा , नीटनेटकेपणा याचा आणि ‘ आरोग्यम धनसंपदा ‘ ह्याचा खूप जवळचा संबंध आहे हे लक्षात आले. कालांतराने आईचे घर सोडून स्वतःचे घर केले आणि हा श्लोक जगण्याची आईने दिलेली शिकवण पाळण्याची एक जबाबदारी येऊन पडली.

व्यवसायाने शिक्षक असल्याने ही गोष्ट फक्त स्वतःपुरतीच किंवा आपल्या मुलांपुरतीच मर्यादित न ठेवता , संपर्कात येणाऱ्या सर्वच मुलांना ह्याची सवय लावावी , त्याचे महत्व पटवून दयावे व त्याची जबाबदारी घ्यायला शिकवावी ही  जाणीव प्रखर झाली.

शाळेतील विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्य हे त्यांच्या अभ्यासाइतकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचे आहे , हा विचार पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे ,केवळ ह्याच उद्देशाने मनातले विचार मांडण्याचे धाडस करीत आहे.

पूर्वप्राथमिक शाळेत म्हणजे सुमारे तीन वर्षे वयापासून मुले शाळेत जायला लागतात. घरातील सुरक्षित वातावरणातून बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क यायला लागतो. ह्या जगात वावरताना निर्भयपणा , आत्मविश्वास, मनाची एकाग्रता इ. अनेक गुणाची आवश्यकता असते. यांचा संबंध कळत न कळत व्यक्तीच्या आरोग्याशी असतो. दिवसातून दोनवेळा दात घासणे, रोज स्वच्छ कपडे घालणे , केस स्वच्छ ठेवणे , नखे कापणे ह्या सर्व गोष्टी लहान मुले अनुकरणाने शिकत असतात. अशी स्वच्छता जर त्यांच्या आजूबाजूला होताना त्यांना दिसली तर अनुकरणाने मुले ह्या सवयी चटकन आत्मसात करतात .

पूर्वप्राथमिक  व प्राथमिक शाळेच्या वयापर्यंत जर ह्या सवयी अंगवळणी पडल्या तर त्यानंतरच्या वयात स्वतःबरोबर परिसराची, घराची , स्वच्छता व त्यामुळे समृध्द होणारे आरोग्य याचीही ओळख विद्यार्थ्यांना होऊ शकते. ह्या वयात मुलांना वेळेचे महत्व , अवेळी गोष्टी केल्यामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम, सकस आहाराचे महत्व, व्यायाम, विश्रांती व करमणूक ह्यांचा समतोल ह्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या गोष्टी जरी शाळेमध्ये शिकवल्या, आहारावर बंधने घातली तरी पालकांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा असते. अनेकवेळा पालकांच्या इतर अतिमहत्वाच्या गोष्टींमुळे , समस्यांमुळे, मुलांचा आहार व आरोग्य याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत पालकांना विश्वासात घेऊन, त्यांची मदत घेऊन ह्यातून मार्ग काढता येतो.

काही विद्यार्थ्यांना आरोग्याच्या काही विशिष्ठ समस्या असतात. पालकांनी त्याची माहिती शाळेमध्ये देणे हिताची असते. अशा विद्यार्थ्यांच्या डॉक्टरचे नाव, फोन नंबर, पत्ता ही शाळेमध्ये दिलेली असावी. विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांना देखील याची माहिती असावी. वर्गशिक्षकांनी देखील आपल्या वर्गातील विद्यार्थ्याना काही आरोग्यविषयक समस्या असतील तर त्या समजून घेतल्या पाहिजे. ह्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यास्यावर परिणाम होत असेल तर पालक, शिक्षक व डॉक्टर यांच्या एकत्र प्रयत्नांनी यातून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करावी.

मुलींच्या आरोग्याबाबतीत , त्यांना त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलाबाबत प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक  असते. मोठ्या वर्गातील मुलींच्या आरोग्याकडे, स्वच्छतेकडे पालकांना, विशेषतः आईला जास्त लक्ष दयावे लागते.कपडयांची स्वच्छता , शरीराची निगा योग्य प्रकारे राखण्याचे शिक्षण मुलींना आईकडूनच मिळते .अशा बाबतीतली कोणतीही समस्या , शंका आईशी मोकळेपणाने बोलता यावी असा विश्वासही घरातून मिळणे आवश्यक आहे .

विद्यार्थ्यांनी देखील पालकांनी , शिक्षकांनी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टींकडे , सूचनांकडे  गंभीरपणे लक्ष दयावे.आपल्यापेक्षा वयाने थोर असलेल्या व्यक्ती काही अनुभवाच्या आधारेच आपल्याला सल्ला देत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि हे सर्व विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच असते ह्याबद्दल निःशंक असावे.आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी , चांगल्या सवयी आत्मसात करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे . चांगल्या सवयीमुळे चांगले आचरण व त्यामुळे चांगले विचार व्यक्तीला चांगले कृती करायला प्रवृत्त करतात . ‘ निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचा वास वास असतो ‘ ह्या म्हणीची सत्यता विद्यार्थ्यांनी समजावून घ्यावी . ह्या गोष्टीची महती कुटुंबामध्ये वर्षानुवर्ष चालत आली आहे . त्यामुळेच रोज देवाला प्रार्थना करताना देवाला चांगले आरोग्य मागण्याचा संस्कार घराघरातून होत होता , आजही होत आहे व भविष्यातही होत राहावा ,


ही सदिच्छा

धन्यवाद

माधुरी गोखले

संपादिका, गृहशाला

0 Comments

Leave a comment

Categories

Recent posts

Education is a magical key

Sun, 22 Sep 2024

Education is a magical key
Top Ten Careers

Sun, 15 Sep 2024

Top Ten Careers