Inspirational journeys

Follow the stories of academics and their research expeditions

शारीरिक व मानसिक आरोग्य

Gruh Shala

Thu, 17 Oct 2024

शारीरिक व मानसिक आरोग्य

विद्यार्थी , त्यांचे पालक व शिक्षक या त्रिसूत्रीवरच  विद्यार्थ्यांचे आरोग्य अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे शारीरिक व मानसिक ह्या दोन्ही स्तररांवरचे असते. कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध असतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचा अभ्यास, शाळा, गृहपाठ, परीक्षा, मित्र-मैत्रिणी ह्या व अशा अनेक गोष्टींमुळे जर मनावर दडपण आले ,  त्यातून काही ताण-तणाव निर्माण झाले , तर त्याचा परिणाम लगेचच त्यांच्या शरीरावर होतो. तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने किंवा पाण्याच्या , हवेच्या प्रदुषणाने जर काही शारीरिक आजार निर्माण झाले तरी त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो. थोडक्यात काय तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही शिक्षक, पालक, स्वतः विद्यार्थी अशी सर्वांचीच एकत्रित जबाबदारी आहे.

एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याबाबत मला काही अडचणी जाणवतात. साधारणतः पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या वयातील मुले खेळ, टीव्ही किंवा गप्पा यामध्ये रंगली की  तहान भूक विसरतात. या वेळी त्यांना भूक लागली आहे किंवा झोप आली आहे याची जाणीव नसते. तसेच काही मुले लघवीला लागली तरी दुर्लक्ष करतात, दाबून धरतात किंवा आळसाने टाळाटाळ करतात. ह्यामुळे पुढे जाऊन काही गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच मुलांचे कपडेही खराब होतात. पण त्या वयात ह्या गोष्टी मुलांना महत्वाच्या वाटत नाहीत. पालक व शिक्षक यांनीच कटाक्षाने याकडे लक्ष दिले पाहिजे.

रोज शाळेत ज्या ठराविक वेळेला डबा खाण्याच सुट्टी होते , त्याच वेळेला सुट्टीच्या दिवशीही मुलांना भूक लागते. पालकांनी ती वेळ लक्षात ठेवून त्यांच्या त्यावेळेला खायला देण्याची तजवीज करावी. मुलांचे लक्ष इतर गोष्टीत असेल तर त्यांना भुकेची जाणीव होत नाही. विद्यार्थी व पालक दोघांनीही ह्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो.

रोज शाळेत जशी डबा खाण्याची सुट्टी असते व त्याला जोडूनच सर्व मुलांना लघवीला जाण्याची सवय शाळेने लावावी. डबा खाऊन झाल्यावर लगेचच त्यांना लघवीला पाठवावे.ज्यायोगे जी मुले याची टाळाटाळ करतात किंवा आळस करतात, त्यांना तशी सवय लागू शकते. जी गोष्ट खाण्याची तीच पाणी पिण्याची. पाणी हा आपल्या शरीरातील अतिशय आवश्यक घटक आहे.शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखण्याचे सवयही मुलांना ह्याच वयापासून लागावी. खाण्याच्या सवयीमध्ये पोटाची भूक व जिभेची भूक असे दोन प्रकार पडतात. सात्विक, पौष्टिक व समतोल आहार हा पोटाच्या भुकेसाठी व चटपटीत, खमंग पदार्थ हे जिभेच्या भुकेसाठी. दोन्ही प्रकारच्या अन्नाचा आहारात समावेश असावा, परंतु त्याचे प्रमाण योग्य असावे. चटपटीत, खमंग पदार्थ शरीराला अपायकारक ठरत असतील तर त्यांचे प्रमाण कमी करावे.पौष्टिक , समतोल आहार मिळणे ही विद्यार्थ्यांची महत्वाची गरज असते. व्यवस्थित पोट भरले असले तरच विद्यार्थी अभ्यासात ,खेळात किंवा शालेयतर प्रकल्पात सहभाग घेऊन , मन एकाग्र करू शकतो. योग्य आहार नसणारी मुले शालेय , शालेयतर कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत, तसेच त्यांचा संयम कमी राहतो किंवा नसतो. सारखी चिडचिड किंवा कुरकुर करत राहतात. ह्या सर्वच गोष्टींची काळजी अगदी लहान वयापासून घेतली पाहिजे, नाहीतर तो आरोग्याचे संतुलन बिघडवते व पर्यायाने व्यक्तीचे ही !


सौ. माधुरी गोखले  

संपादिका, गृहशाला

0 Comments

Leave a comment

Categories

Recent posts

Education is a magical key

Sun, 22 Sep 2024

Education is a magical key
Top Ten Careers

Sun, 15 Sep 2024

Top Ten Careers