Education is a magical key
Sun, 22 Sep 2024

Follow the stories of academics and their research expeditions
जुलै महिना म्हणजे एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे शाळेच्या नवीन वर्षाची सुरवात .परवाच कुणी म्हणाले की शाळेला आता पावसाळ्यात सुट्टी देऊन उन्हाळ्यात शाळा भरवावी. खरच काय असेल या सूचनेचे कारण ? पावसाळ्यात सध्या रस्त्यांची होणारी दुरवस्था , वाहतुक अव्यवस्था आणि ह्या सगळ्यांचा त्या बिचाऱ्या छोट्या जीवांवर होणारा परिणाम ! पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे शाळेत अनुपस्थितीचे प्रमाणही अधिक . काय उपाय आहे या सगळ्यांवर ? मी कुणी डॉक्टर नाही किंवा शिक्षणतज्ञही नाही. एक सामान्य शिक्षक व पालक ह्या भूमिकेतून मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. जेव्हा मी प्रथम त्याचा विचार केला तेव्हा प्रकर्षानी जाणीव झाली ती म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची .
रोज वर्तमानपत्रातून पावसाच्या पूरस्थितीच्या आणि ठिकठिकाणी रस्त्यात पाणी साठलेल्या बातम्या वाचनात येतात . अशा परीस्थित मुले चालत , सायकलवर किंवा बसने शाळेत जातात . पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेणे एकीकडे आणि अशा परिस्थितीत शाळेत वेळेवर पोहोचण्याची कसरत करणे दुसरीकडे.
शाळेचे दप्तर व पुस्तके भिजू नये म्हणून काळजी घेताना त्यांना स्वतःला भिजायला होते . स्वतः भिजले आणि शाळेत जाऊन बसले तर दिवसभर तोच ओला गणवेश घालून बसावे लागते. दिवसभरात कधीतरी अंगावरच तो वाळतो. अशा परिस्थितीत दिवसभर शाळेत त्यांचे अभ्यासात लक्ष लागते का? अंग भिजते , डोके ओले होते त्यामुळे उद्भवणारे आजार त्यांचे काय?
समजा शाळा सुटल्यावर पाऊस आला तर गणवेश व दप्तर भिजू नये अशी दुहेरी काळजी व त्यासाठीची कसरत करीत घरी जावे लागते . घरी जाताना गणवेश भिजला तर तो रात्रीच्या रात्री वाळून परत उद्या परत घालता येईल का? ही चिंता . इतर मित्र-मैत्रिणी हसतील का ? असे विचार . ह्या सगळ्या परिस्थितून हे विद्यार्थी कसा मार्ग काढतात आणि त्यांचे पालक त्यांना कशी मदत करतात हे मला पडलेले एक कोडेच आहे.
आता जरी ह्या परिस्थितीवर मात केली तरी ह्या हंगामात होणारे आजार, सर्दी, खोकला, ताप, पाण्यात फार काळ हात , पाय राहिले तर उद्भवणारे त्वचारोग हयाचा विचार कोण करते? विद्यार्थांचा आरोग्य हा शाळा ,कुटुंब , समाज ह्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाचा विषय असला पाहिजे.
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या ज्या परिस्थितून विद्यार्थी जातो त्या परिस्थितीचा फक्त त्याच्या शारीरिक आरोग्यावरच परिणाम होतो असे नाही तर त्याचे मानसिक आरोग्यही बिघडते. विद्यार्थ्यांच्या मनावर विविध कारणांनी येणारे ताण-तणाव त्यांचे मानसिक आरोग्य बिघडवतात. यातून तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी काही विद्यार्थी त्यांना योग्य तो मार्ग अवलंबतात. यामध्ये काही विद्यार्थी डोके दुखते, पोट दुखते अशी खोटी कारणे सांगून शाळेला सुट्टी घेतात किंवा शाळेतून आजारी असल्याचा बहाणा करून लवकर घरी जाण्यासाठी परवानगी मिळवतात.हे उदाहरण फारच सहज व सोपे आहे. कदाचित शाळेतून सुट्टी घेऊन , घरातून शाळेसाठी बाहेर पडून इतर ठिकाणी आपला वेळ घालवण्यात विद्यार्थ्यांना मजा वाटते. शाळेला व घरच्यांना कुणालाच याची कल्पना नसते.ह्यातूनच काही असामाजिक प्रवृत्तींचा उगम होतो. पर्यायाने सामाजिक आरोग्य धोक्यात येते. एक पालक , एक शिक्षक तसेच सुजाण नागरिक म्हणून आपण ह्याचा विचार करू या का ?
सौ. माधुरी गोखले
संपादिका, गृहशाला
Sun, 22 Sep 2024
Sun, 15 Sep 2024
Tue, 10 Sep 2024
Leave a comment